Ad will apear here
Next
सर्कस... सर्कस!
माणसाने माणसांसाठी ‘सर्कस’ हे अद्भुत कसरतींचे आणि नेत्रदीपक आविष्कारांचे अफलातून खेळ कधी सुरू केले असतील? ज्ञात इतिहास काय सांगतो? कुठल्या देशांत याचा उगम सापडतो? किती प्रकारचे प्राणी सर्कशीत असतात आणि त्यांना प्रशिक्षण कसं दिलं जातं? सुरुवातीपासून आजपर्यंत या खेळात कसकसे बदल होत गेले... अशा सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी श्यामला शिरोळकर यांचं ‘सर्कस ...सर्कस!’ हे रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तक अवश्य वाचायला हवं. त्या पुस्तकाचा परिचय...
....................
आयुष्यात एकदाही सर्कस न पाहिलेला माणूस विरळाच! प्रत्येकाने कधी ना कधी, कुठे ना कुठे, कदाचित आपल्या लहानपणी किंवा मग मोठे झाल्यावर आपल्या लहान मुलांसाठी सर्कसच्या तंबूत पाऊल ठेवून तिथला थरार आयुष्यात एकदा तरी अनुभवलेला असतोच! सर्कस म्हणजे हृदयाचा ठोका चुकवायला लावणाऱ्या झुल्यांवरच्या कसरती असतात, हसून लोळायला लावणारी विदुषकांची धमाल असते, केवळ पाळीवच नव्हे, तर जंगली प्राण्यांचेही तोंडात बोटं घालायला लावणारे खेळ असतात, संगीताच्या लयबद्ध तालावर आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या झगमगाटात आकर्षक शारीरिक कौशल्यांचे आणि चापल्याचे विस्मयकारक आविष्कार असतात.   

३०-४० वर्षांपूर्वी ज्यांनी सर्कशी पाहिल्या असतील ते जरा जास्त भाग्यवान म्हणता येतील. कारण, प्राण्यांसंबंधीचे कायदे येण्याआधीच्या त्या काळात अनेक सर्कशींमधून वेगवेगळ्या प्राण्यांच्या नेत्रदीपक आणि आश्चर्यकारक करामती पाहायला मिळायच्या. नंतरच्या काही वर्षांत मात्र सर्कशींमध्ये प्राण्यांच्या वापरावर निर्बंध आल्यामुळे बहुतांशी माणसांच्याच करामती नि कलात्मक आविष्कार पाहायला मिळतात.
 
... पण आपण असा कधी विचार केलाय का, की हे सर्व नक्की कधी सुरू झालं असेल? ज्ञात इतिहास काय सांगतो? माणसाने माणसांसाठी हे मनोरंजनाचे अफलातून खेळ आणि मेळे कधी सुरू केले असतील? कुठल्या देशांत याचा उगम सापडतो? किती प्रकारचे प्राणी सर्कशीत असतात आणि त्यांना प्रशिक्षण कसं दिलं जात असेल? सुरुवातीपासून आजपर्यंत या खेळात कसकसे बदल होत गेले असतील.... अशा सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी श्यामला शिरोळकर यांचं ‘सर्कस ...सर्कस!’ हे रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तक अवश्य हातात घ्यायला हवं. त्यांनी सखोल अभ्यास करून आणि अनेक ग्रंथांचा धांडोळा घेऊन हा २८२ पानांचा ग्रंथ तयार केला आहे आणि त्यांच्या परिश्रमांना दाद द्यायलाच हवी इतका तो देखणा झाला आहे. 

दहा प्रकरणांत विभागलेल्या या ग्रंथामध्ये श्यामला शिरोळकर यांनी भारत, ग्रीस, इटली, फ्रान्स, रशिया, ब्रिटन, अमेरिका, जर्मनी अशा विविध देशांतल्या प्राण्यांच्या कसरती आणि करामतींच्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा यांसंबंधी विस्तृत माहिती देऊन माणूस आणि प्राण्यांमधल्या या एका विलोभनीय नात्यांची सफर वाचकांना घडवली आहे. हा प्राचीन इतिहास वाचताना आपण रंगून जातो.  

भारतीयांना नक्कीच अभिमान वाटेल, की सर्कस या खेळाचा उगम ऋग्वेद काळापासून भारतात होणाऱ्या रथांच्या शर्यती आणि अश्वारोहणाच्या प्रात्यक्षिकांमध्ये आहे. सर्कस म्हटल्यावर जे काही डोळ्यांसमोर येतं, त्यांसारख्या कसरती आणि करामती प्राचीन काळी इथे घडत होत्या. रथांच्या शर्यती, अश्वारोहण, नृत्य, धनुर्विद्या, बांबूंवरच्या कसरती, योगसामर्थ्याचं प्रदर्शन, नेमबाजी, जादू असे एकाहून एक विस्मयकारक खेळ सादर केले जात होते. तऱ्हेतऱ्हेच्या कसरती करणारे ‘स्तंभनट’, नृत्यरत्नावली सादर करणाऱ्या ‘कोल्हाटिका’, केवळ अविश्वसनीय अशा सिद्धी प्राप्त केलेले ‘योगी’, एका हाताने किंवा दोन्ही हातांनी अनेक वस्तू हवेत गोलाकार गतीने फिरत ठेवण्याच्या ‘अंबरकरंडक’ विद्येत माहीर असणारे साधक, अचाट मल्लविद्या प्राप्त केलेले मल्ल, केवळ अद्भुत म्हणता येईल अशा करामती दाखवणारे धनुर्धर आणि नेमबाज, रथांच्या मनोहारी करामती करणारे सारथी – या सर्वांची वर्णनं ऋग्वेद, शुक्ल यजुर्वेद, अथर्ववेद, वाजसेनीय संहिता, शतपाठ ब्राह्मण, संगीत रत्नाकर, रससदन, दशकुमारचरितम्, योगशास्त्र, कौटिलीय अर्थशास्त्र, ब्रह्मजालसुत, ललितविस्तार, रॉबर्ट आणि थॉमस ब्राइटन यांचं लेखन, मातंगलीला, शुक्रनीती, मानसोल्लास अशा अनेक ग्रंथांतून आढळतात, याचे तपशील शिरोळकर यांनी फार सुंदर दिले  आहेत.

भारतीय सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे आणि या व्यवसायात नावलौकिक मिळवणारे काशिनाथपंत छत्रे, सदाशिवराव कार्लेकर, शंकरराव लहाने, तुकारामशेठ शेलार, दामू धोत्रे, बाबासाहेब देवल, परशुराम माळी, किलरी कुल्हीकन्नन, राममूर्ती, रामभाऊ शेळके, ताराबाई, शमसुद्दीन आणि अब्बास, मादुस्कर, वालावलकर अशा आणि इतरही भारतीय सर्कसवाल्या मंडळींचा या पुस्तकात सविस्तर परिचय करून दिला गेला आहे. त्यांनी किती कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने आणि नेटाने या व्यवसायात उतरून यशस्वी होऊन दाखवलं, ते वाचताना भारावून जायला होतं.

ग्रीस आणि रोमन इतिहासात येणाऱ्या सिंह, हत्ती, उंट, घोडे यांसारख्या विविध प्राण्यांच्या कसरती आणि खेळांचे उल्लेख या पुस्तकाच्या रंजकतेत भर घालतात. भारतात विष्णुपंत छत्रे यांचं सर्कस धंद्यात जे स्थान आहे, ते इंग्लंडमध्ये फिलीप अॅस्टलेचं आहे. त्याची रोमांचकारी कथा, त्याशिवाय अँड्र्यू ड्रको, जॉर्ज सॅन्गर, थॉमस कुक, फॉसेट, बर्ट्रांम मिल्स आणि इतर इंग्लिश मंडळी यांची सुरस माहिती आपल्याला वाचायला मिळते.

अचाट कल्पनाशक्ती, अफाट धंदेवाईक दृष्टी आणि प्रचंड जाहिरातबाजी यांनी भरलेला अमेरिकन सर्कसचा इतिहास म्हणजे तर वाचकांना मेजवानीच आहे. फ्रेंच, रशियन आणि जर्मन सर्कसविश्वाचीही सविस्तर माहिती या ग्रंथात आहे. याशिवाय सौ. शिरोळकर यांनी तब्बल ३६ पानांमध्ये विदुषकांच्या जगताचं अत्यंत बहारदार वर्णन केलं आहे. तसंच ‘प्राणिविश्व’ या प्रदीर्घ प्रकरणामधून हत्ती, घोडे, कुत्रे, चिम्पान्झी, ओरांगउटान, सिंह, वाघ, अस्वलं आणि काही पक्षी यांची अत्यंत मनोरंजक माहिती त्यांनी वाचकांना करून दिली आहे.  

सर्कशीसाठी किती प्रकारची मंडळी राबत असतात त्यांची माहिती आपल्याला शेवटच्या प्रकरणात मिळते. थोडक्यात म्हणजे ‘सर्कस’या विषयाची इत्थंभूत माहिती देणारं आणि वाचकांची जिज्ञासा अत्यंत रोचक भाषेत पूर्ण करणारं एक सुरेख पुस्तक म्हणजे ‘सर्कस...सर्कस!’.... जरूर संग्रही ठेवावं असं.

सर्कस... सर्कस!
लेखिका : श्यामला शिरोळकर 
प्रकाशक : श्री ऐश्वर्यगणेश प्रकाशन, एक, रचना हेरीटेज, जुन्या कर्नाटक शाळेजवळ, पुणे-४ 
पृष्ठे : २८२  
मूल्य : ४५० रुपये  

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZPVBI
Similar Posts
नियतीचे प्रतिबिंब हातावरच्या रेषा, उंचवटे, बांधणी, स्पर्श, रंग, हाताचा आकार, तळहातावर असणाऱ्या विविध आकृत्या (फुल्या, चांदणी, साखळी, मत्स्य, डाग), बोटांची कमी-जास्त लांबी, एकमेकींना छेडणाऱ्या रेषा, रेषांचे वळसे या सर्वांचा आपल्या शरीर प्रकृतीशी, प्रारब्धाशी असणारा संबंध यातून प्रत्येक केस कशी हाताळली आणि हस्तरेषांचा अभ्यास
झुंज श्वासाशी आजारी माणसाला उपचाराच्या शेवटच्या टप्प्यांत ऑक्सिजनची गरज भासते; पण ज्याचे हॉस्पिटलमधले प्राथमिक उपचारच ऑक्सिजन घेऊन सुरू होत असतील त्याच्या आयुष्याची शाश्वती किती कठीण? ज्याला वयाच्या १६व्या वर्षीच त्यापुढचा प्रत्येक दिवस ‘बोनस’ असणार आहे, हे कळलं असेल, त्याच्या मनाची घालमेल इतरांना कशी कळावी? मुकुल
प्रोग्रामिंग इन ‘सी’ ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ हे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक आहे. नवशिक्यांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा या पुस्तकाविषयी...
निवडणुकीसाठी बिनमहत्त्वाच्या गोष्टी देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या, जिव्हाळ्याच्या आणि गंभीर प्रश्नांकडे अत्यंत वस्तुनिष्ठपणे पाहत, त्याविषयीचे आपले परखड विचार आणि मते ठोसपणे मांडणाऱ्या आणि वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या ३० वैचारिक लेखांचे ‘निवडणुकीसाठी बिनमहत्त्वाच्या गोष्टी’ असे वेगळ्या धाटणीचे शीर्षक असलेले पुस्तक अजय महाजन यांनी आपल्यासमोर आणले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language